अहमदनगर :- यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव ७ सप्टेंबरपासून सुरू होतो आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाला पुरस्कार दिला जाणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या ई-मेल आयडीवर अर्ज पाठवणे आवश्यक आहे. या स्पर्धेत धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलिसांकडे किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येईल. स्पर्धेत जास्तीत जास्त गणेश मंडळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
निकष काय?
सांस्कृतिक कार्यक्रम, संस्कृतीचे जतन, गडकिल्ले जतन व संवर्धन, सामाजिक उपक्रम, पर्यावरणपूरक मूर्ती, पर्यावरणपूरक सजावट, ध्वनिप्रदूषणरहित वातावरण, पारंपरिक देशी खेळांच्या स्पर्धा तसेच गणेशभक्तांसाठी देत असलेल्या सुविधांची पाहणी करून गुण दिले जाणार आहेत. या स्पर्धेत सहभागी गणेशोत्सव मंडळांनी केलेल्या कार्याबाबतचा कालावधी सन २०२३ च्या अनंत चतुर्दशी ते सन २०२४ च्या गणेश चतुर्दशीपर्यंतचा असेल.
प्रथम पुरस्कार पाच लाखांचा
राज्यातील पहिल्या तीन क्रमांक विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून अनुक्रमे पाच लाख, अडीच लाख आणि एक लाख रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
जिल्हास्तरावर २५ हजार रुपये
जिल्ह्यातून प्रत्येकी एक सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाची शिफारस केली जाईल. मंडळाचे नाव, सर्व कागदपत्रे व व्हिडीओसह राज्यस्तरीय निवड समितीकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठविले जाईल. जिल्ह्यातील विजेत्या मंडळास २५ हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र दिले जाईल.
३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा
गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मंडळांना ३१ ऑगस्टपर्यंत mahotsav.plda@gmail.com या ई-मेल आयडीवर अर्ज करावा लागेल. मुदतीत अर्ज आलेल्या मंडळाची पाहणी केली जाणार आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय किंवा संबंधित तहसील कार्यालय यांच्याशी संपर्क करावा.