पारायण सोहळया निमित्त आज श्रींच्या पवित्र ग्रंथाची शिर्डी शहरातून मिरवणूक काढून सांगता
शिर्डी:-
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी व नाट्य रसिक मंच, शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ०५ ऑगस्ट, २०२४ रोजी सुरु झालेल्या पारायण सोहळया निमित्त आज श्रींच्या पवित्र ग्रंथाची शिर्डी शहरातून मिरवणूक काढून सांगता झाली.
दिनांक १२ ऑगस्ट पर्यंत चाललेल्या या पारायण सोहळयामध्ये शिर्डी व पंचक्रोशितील सुमारे ६ हजार ५०० पारायणार्थी सहभागी झाले होते. आज सकाळी अध्याय क्रमांक ५३ (अवतरणिका) वाचन होवुन, ग्रंथ समाप्ती झाली. त्यानंतर श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाची पुजा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. वंदना गाडीलकर यांचे हस्ते करणेत आली. याप्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, मंदीर प्रमुख विष्णु थोरात, नाट्य रसिक मंचाचे पदाधिकारी आदींसह पारायणार्थी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
पारायणार्थींसाठी आज सकाळी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी ३.३० वाजता श्री साईसच्चरित पारायण समाप्तीच्या मिरवणुकीमध्ये पारंपारीक संबळ वाद्यांचे १०-१२ पथके, श्री देव कुडाळेश्वर मित्र मंडळ, कुडाळ यांचे ३ धार्मिक देखाव्यांचे चित्ररथ व विषेश आकर्षण रंजीनी आर्टस, मालाप्पुरा, केरळ यांचे पारंपारिक वाद्य व दाक्षिणात्य नृत्यासह विविध सोंगे आदींचा समावेश होता. या मिरवणूकीत पारायणार्थी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. दुपारी ०३.०० ते ०५.०० यावेळेत श्री अरविंद महाराज, शिर्डी यांचा संगीतमय साईकथा कार्यक्रम, सायं.५.३० ते ६.३० यावेळेत डॉ. नचिकेत वर्पे, शिर्डी यांचा योग व आहार या विषयावर व्याख्यान व सायं.०७.३० ते ०९.३० यावेळेत बालकिर्तनकार ह.भ.प. कृष्णा हजारे, शिर्डी यांचा किर्तनाचा कार्यक्रम गेट क्र. ०३ समोरील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्दी मंडपाच्या स्टेजवर संपन्न झाला. तर मिरवणूक परत आल्यानंतर पारायण मंडपात वीणा पूजन करणेत आले.
पारायण सोहळ्याच्या निमित्ताने आठ दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक, कीर्तन, प्रवचन आदि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते. मंगळवार दिनांक १३ ऑगस्ट रोजी सकाळी १०.०० ते १२.०० यावेळेत पारायण मंडपात ह.भ.प. श्री. गंगाधर बुवा व्यास यांचे काल्याचे कीर्तन व त्यानंतर दुपारी १२.३० ते ०३.०० यावेळेत महाप्रसादाचा कार्यक्रम साईआश्रम ०१ शताब्दी मंडप या ठिकाणी होणार आहे.