शिर्डी (प्रतिनिधी) केंद्राकडून अहिल्यानगर जिल्ह्यातील तीन नाशिक-साईनगर शिर्डी, पुणे-अहिल्यानगर नवीन दुहेरी ट्रॅक आणि साईनगर शिर्डी-पुणतांबा दरम्यान नवीन दुहेरी ट्रॅक अशा तीन रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्राकडून सर्वेक्षणास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे साईभक्त व प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.
या तिन्ही प्रकल्पांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून पाठपुरावा सुरू होता. राज्याचे जलसंपदामंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, तसेच माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी या रेल्वे मार्ग प्रकल्पांसाठी पाठपुरावा केला होता. माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यासाठी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी केली होती.
यासाठी त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेटही घेतली होती. दरम्यान, विखे पाटील पिता पुत्र यांच्या या मागणीवर केंद्राकडून सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. या तिन्ही नवीन दुहेरी रेल्वे मार्ग प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पांच्या सर्वेक्षणासं केंद्राकडून मंजुरी मिळाली असल्याने या प्रकल्पाचे सर्वेक्षण लवकरच सुरू होणार आहे.
दरम्यान या प्रकल्पांचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर याचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजेच डीपीआर तयार केला जाणार आहे. डीपीआर तयार झाल्यानंतर मग हे डीपीआर पुन्हा एकदा मंजुरीसाठी पाठवले जाणार आहेत. डी पी आर अहवालासं मंजुरी मिळाल्यानंतर मग प्रत्यक्षात या प्रकल्पांचे काम सुरू होऊ शकणार आहे.
नाशिक ते साईनगर शिर्डी दरम्यानचा 82 किलोमीटर लांबीचा मार्ग, पुणे ते अहिल्यानगर दरम्यान चा १२५ किलोमीटर लांबीचा नवीन दुहेरी मार्ग आणि साईनगर शिर्डी ते पुणतांबा दरम्यानचा 17 किलोमीटर लांबीचा दुहेरी मार्ग हे 3 महत्त्वकांक्षी प्रकल्पाच्या सर्वेक्षणास मंजुरी मिळाली असल्याने या प्रकल्पांच्या कामाला आता गती मिळणार आहे.
तसेच अहिल्यानगर शहर- पुणे-नाशिक दरम्यानची रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी २४८ कि.मी. लांबीच्या दौंड-मनमाड मार्गाच्या दुहेरीकरणास मान्यता देण्यात आली आहे. एकूण २४८ कि. मी. पैकी १७८ कि. मी. चे काम पूर्ण झाले असून, उर्वरित ७० कि. मी. चे काम प्रगतिपथावर आहे.
हे 3 प्रकल्प अहिल्यानगर जिल्ह्यातील एकात्मिक विकासासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. पुण्याला देखील या प्रकल्पाचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. कृषी पर्यटन शिक्षण उद्योग अशा विविध क्षेत्रांसाठी हे तीनही रेल्वे मार्ग फायद्याचे राहणार असून या प्रकल्पांचे काम लवकरात लवकर पूर्ण झाले पाहिजे .
अशी इच्छा नागरिकांच्या माध्यमातून व्यक्त होत आहे. त्याचप्रमाणे पुणतांबा ते रोटेगाव या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण व्हावे अशीही प्रवाशांची मागणी आहे. साईनगर शिर्डी ते पुणतांबा दुहेरी रेल्वे मार्ग झाला. त्याचप्रमाणे साईनगर शिर्डी ते नाशिक हा रेल्वे मार्ग झाला तर शिर्डीला येणाऱ्या साई भक्तांना मोठी सोय होईल. तसेच रेल्वे गाड्यांची संख्या वाढेल. व शिर्डी साईनगर व परिसराचाही त्यामुळे झपाट्याने आणखी विकास होण्यास मदत होईल. त्यामुळे शिर्डी सह परिसरातील त्याचप्रमाणे साईभक्त आणि प्रवाशां कडून मोठे समाधान व्यक्त होत आहे.