महसूल कर्मचाऱ्यांचे उद्यापासून काम बंद; प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन
सुधारित आकृतिबंध हा दांगट समितीच्या अहवालातील शिफारशीनूसार कोणत्याही संवर्गातील कर्मचारी कपात न करता त्वरित लागू करा, यासह अन्य प्रलंबित मागण्यासाठी येत्या सोमवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे, अशी माहिती महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष परेश खोसरे व विभागीय सरचिटणीस महेंद्र गिरमे यांनी दिली.
प्रलंबित मागण्यासाठी १० जुलैपासून आंदोलन सुरु
महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने या आंदोलनाची हाक दिली आहे. महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत गेल्या काही वर्षांत अन्याय झालेला आहे. आठ वर्षापूर्वी मागण्या मान्य होऊनदेखील त्याबाबत अद्यापही शासन निर्णय होत नसल्याचे संघटनेने नमूद केले. २००६ मध्ये महसूल विभागाचा आकृतिबंध तयार करण्यात आला. त्यानूसार २०१६मध्ये आकृतिबंध होणे क्रमप्राप्त होते. मात्र अद्यापही आकृतिबंध मजूर झाला नाही. प्रलंबित मागण्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी १० जुलैपासून आंदोलन सुरू आहे. मात्र, कोणताही ठोस निर्णय होत नसल्याने बेमुदत काम बंद आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचेही त्यांनी नमूद केले.