विधानसभा निवडणुका तोंडावर असताना निवडणूक आयोगाने राज्याच्या पोलीस महासंचालकपदावरून रश्नी शुक्ला यांना हटवण्याचे आदेश दिले होते. रश्मी शुक्ला यांची बदली केल्यावर विवेक फणसाळकर, संजय कुमार वर्मा आणि संजीव कुमार सिंघल डी.जी. पी (अँटी करप्शन ब्युरो) या तीन नावांची चर्चा होती.
यामधील विवेक फणसाळकर यांची निवड झाली आहे. मुंबई पोलीस आयुक्त असलेल्या विवेक फणसाळकर यांच्याकडे राज्य पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
विवेक फणसाळकर हे १९८९ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. मुंबई पोलिस आयुक्तपदी निवड होण्याआधी महाराष्ट्र पोलिस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाचे संचालक होते. तर २०१६-१८ मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अतिरिक्त पोलिस महासंचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे.
दहशतवाद विरोधी पथकाचेही ते प्रमुख होते. पुण्याचे असलेल्या फणसळकर यांची अकोला येथील अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून पहिली नेमणूक झाली होती ‘कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’मध्ये दक्षता विभागाचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केले. नाशिक पोलीस आयुक्तालयात उपायुक्त म्हणून कार्यभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी वर्धा आणि परभणीत अधिक्षक पद भूषविले.
विवेक फणसळकरांना मुंबईची आणि मुंबई पोलिस दलाची चांगल्या प्रकारे माहिती आहे. मुंबई पोलिस दलात प्रशासन विभाग आणि मुंबईच्या वाहतूक कोंडीची समस्या हाताळणाऱ्या वाहतूक शाखेचे सहआयुक्त म्हणून त्यांनी भरीव काम केले. शांत स्वभाव पण तितकेच शिस्तप्रिय आणि इंग्रजीवर प्रभुत्व ही फणसळकर यांची वैशिष्ट्ये आहेत.