शिर्डीत श्री साई सच्चरित्र पारायणास मोठ्या उत्साहाने सुरुवात
शिर्डी:-
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी, नाट्य रसिक मंच, शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक ०५ ऑगस्ट, २०२४ ते सोमवार दिनांक १२ ऑगस्ट २०२४ याकालावधीत चालणा-या श्रीसाईसच्चरित पारायण सोहळ्याला आज मंगलमय वातावरणात सुरुवात झाली असून, या पारायण सोहळ्यात अंदाजे सुमारे ०५ हजाराहुन अधिक महिला व ०१ हजार ५०० हुन अधिक पुरुष असे सुमारे ०६ हजार ५०० पेक्षा अधिक पारायणार्थींनी सहभाग घेतला.
आज सकाळी समाधी मंदिरातून श्रींच्या श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाची व फोटोची हनुमान मंदिर व व्दारकामाई मार्गे साईआश्रम भक्तनिवास येथील पारायण मंडपापर्यंत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी पोथी, उपकार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे व कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे यांनी श्रींची प्रतिमा, व मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या सुविद्य पत्नी सौ. वंदना गाडीलकर यांनी कलश घेवून सहभाग घेतला. यावेळी नाट्य रसिक मंच, शिर्डी यांचे पदाधिकारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेट नंबर ०४ पासून ते पारायण मंडपापर्यंत १० पुरूष लकी ड्रॉ भाग्यवान साईभक्तांनी टप्या-टप्याने श्री साईबाबांची तसबीर घेऊन तर प्रत्येकी २० महिला लकी ड्रॉ भाग्यवान साईभक्तांनी टप्या-टप्याने श्री साईबाबांची पोथी व कलश घेऊन सहभाग नोंदविला. यावेळी प्रशासकिय अधिकारी विश्वनाथ बजाज, मंदिर प्रमुख विष्णु थोरात, नाटय रसिक मंचाचे पदाधिकारी, मंदिर पुजारी, संस्थानचे कर्मचारी, ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मिरवणूक पारायण मंडपात आल्यानंतर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व मान्यवरांच्या हस्ते ग्रंथ व कलश पूजन करुन, श्री साईसच्चरित पारायण वाचनाचा शुभारंभ करण्यात आला. सकाळी ०७.०० ते ११.३० पुरूष वाचक व दुपारी ०१.०० ते ०५.३० महिला वाचक यांचे यावेळेत श्री साईसच्चरिताचे वाचन करण्यात आले. दुपारी ०३.०० ते ०५.०० यावेळेत अनहद ग्रुप, नाशिक यांचा संगीतमय भक्तीसंगीत कार्यक्रम, सायंकाळी ०५.३० ते ०६.३० यावेळेत श्री. ज्ञानदेव आबा गोंदकर यांचा समाधीनंतर श्री साईबाबांचे साक्षात्कार या विषयावर प्रवचण व रात्रौ ०७.३० ते ०९.३० यावेळेत ह.भ.प. सौ. सुजाताताई पा. कदम चाळाखेकर, नांदेड यांचा किर्तनाचा कार्यक्रम गेट क्र. ३ समोरील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्दी मंडपात होणार आहे.