शिर्डी( प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टीचे श्री क्षेत्र शिर्डी येथे 12 जानेवारी 2025 रोजी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या दिनी प्रदेश अधिवेशन होणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा नुकत्याच पार पडल्या .त्यामध्ये महायुतीला घवघवीत यश आले असून भाजपाचे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले आहेत. महाराष्ट्रात घवघवीत यश मिळाल्यानंतर भाजपाचे प्रदेश अधिवेशन प्रथमच शिर्डी येथे 12 जानेवारी 2025 रोजी होत आहे.
या प्रदेश अधिवेशनाला भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे भाजपाचे सर्व पदाधिकारी आजी-माजी मंत्री , कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
12 जानेवारीला स्वामी विवेकानंद यांची जयंती असून त्याचे औचित्य साधून महाराष्ट्र प्रदेश भाजपाने एक मोठा उपक्रम हाती घेतला आहे .
स्वामी विवेकानंद यांच्या विचारावर आधारित हे अधिवेशन असणार आहे. स्वामी विवेकानंद यांच्या विचारानुसार युवकांना प्रेरित करून भाजपाकडे आकर्षित करण्यासाठी यावेळी नवीन अभियानाची सुरुवात होणार आहे.
त्याचप्रमाणे या अधिवेशनामध्ये नवनिर्वाचित व तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले नामदार देवेंद्र फडणवीस यांचा भव्य सत्कार केला जाणार आहे.
शिर्डी येथील या अधिवेशनासाठी राज्यभरातून सुमारे 10000 च्या वरती भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार असून हे अधिवेशन भाजपाच्या आगामी काळातील योजनांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. असेही यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.