राज्याचे गृहमंत्री युजलेस:- राऊत
वरळी हिट अँड रन प्रकरणावर बोलताना ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चांगलंच फैलावर घेतलं. मुख्यमंत्र्यांनी वरळी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या कावेरी नाखवा यांच्या कुटुंबीयांना 10 लाखांची मदत जाहीर केलीय,
यावरुनही संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर ताशेरे ओढले आहेत. मुख्यमंत्री पैसे वाटत फिरतायत, ती महिला काय खोकेवाल्या आमदाराची बायको आहे? असा परखड सवालच संजय राऊतांनी विचारला आहे. तसेच, मी वैयक्तिक टीका करत नाही, पण राज्याचे गृहमंत्री युजलेस आहेत, असं म्हणत संजय राऊतांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही खडे बोल सुनावले आहेत. तसेच, निर्दयीपणे कावेरी नाखवांना चिरडलं गेलं, ती तुमची लाडकी बहीण नाही का? असं म्हणत राऊतांनी थेट हल्ला चढवला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत बोलताना म्हणाले की, “जोपर्यंत वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी आणि त्यांचं कुटुंबीय यांना शिक्षा होत नाही, तोपर्यंत तुमच्या 10 लाखांना किंमत नाही. त्यांचा जीव 10 लाखांचा आहे का? असं काय झालं की, मुख्यमंत्री पैसे वाटत फिरतायत,
ते काय खोकेवाल्या आमदाराची बायको आहे की, खोकेवाले आहेत ते? आले की, पैसे वाटायचे, याला वाटा, त्याला वाटा. कायदा-सुव्यवस्था या राज्यात नग्न झालेली आहे, चिरडून मरतेय. राज्याचे गृहमंत्री, मी व्यक्तीगत म्हणत नाही, युजलेस गृहमंत्री आहेत. आतापर्यंत एवढी भीषण दुर्घटना मुंबईच्या रस्त्यावर घडली, गृहमंत्र्यांकडून साधं निवेदन नाहीतर, साधी संवेदनाही नाही.”