नगर : मुस्लीम समाजाच्या तुष्टीकरणासाठी काँग्रेस रोज खालच्या पातळीवर जात आहे. आता काँग्रेसची पाकिस्तानातील ‘बी टीम’ही कार्यान्वित झाली आहे. मुंबईवरील २६/११च्या हल्ल्यातील अतिरेक्यांना काँग्रेसने ‘क्लीन चिट’ देऊन निर्दोषत्वाचे प्रमाणपत्रही जारी केले आहे.
काँग्रेस नेत्यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या मृत्यूबाबत केलेले वक्तव्य धक्कादायक असून शहिदांचा अपमान करणारे आहे, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. ४ जूनला ‘इंडिया आघाडी’ विसर्जित होईल, असा दावाही त्यांनी केला.डॉ. सुजय विखे व शिर्डीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी नगरमध्ये मंगळवारी पंतप्रधानांची प्रचारसभा झाली.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री भागवत कराड, चारा घोटाळ्यातील बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यांचे नाव प्रेक्षकांच्या तोंडून वदवून घेत मोदी म्हणाले, की काँग्रेस सत्तेवर आल्यावर मुस्लिमांना पूर्ण आरक्षण दिले जाईल, असे ते सांगत आहेत. सध्या देशात केवळ एससी, एसटी, ओबीसी व गरिबांना पूर्ण आरक्षण आहे.
काँग्रेस ते हिसकावून त्यांची ‘व्होट बँक’ असलेल्या मुस्लिमांना देण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार मोदी यांनी केला. ही लढाई भाजप आघाडीने गरिबांचे केलेले संतुष्टीकरण विरुद्ध काँग्रेस आघाडी मुस्लिमांचे करत असलेले तुष्टीकरण यांच्यामध्ये आहे, असे ते म्हणाले.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या अलिकडील विधानाचा संदर्भ घेऊन पंतप्रधान म्हणाले, की २६/११च्या हल्ल्यातील आरोपींना न्यायालयाने शिक्षा दिली असून पाकिस्ताननेही ते मान्य केले आहे. असे असताना कसाबला निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र देणाऱ्या काँग्रेसला जनता मतदानातून धडा शिकवेल.