प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर राज्यात आज (गुरुवारी) एक दिवसांचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे. रतन टाटा यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आणि श्रद्धांजली म्हणून हा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
त्याचबरोबर आज ज्येष्ठ उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांना आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचा शोकप्रस्ताव बैठकीत मांडला. यावेळी रतन टाटा यांचे कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्तावही संमत करण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड शहराची औद्योगिक नगरी ही ओळख निर्माण करण्या मध्ये टाटा मोटर्सचा मोठा वाटा आहे. टाटा मोटर्स मुळे शहरातील हजारो कामगारांना रोजगार उत्पन्न झाला. टाटा मोटर्सचे सर्वेसर्वा रतन टाटा यांच्या निधनाने दैवत हरवल्याची भावना कामगारांनी व्यक्त केलीय.
हिंदू, मुस्लीम, ख्रिस्ती, पारशी, शीख, बौद्ध अशा सात धर्मगुरुंकडून रतन टाटांसाठी अखंड प्रार्थना होताना यावेळी पाहायला मिळालं.ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे पार्थिव सकाळी त्यांच्या हलेकाय या राहत्या निवासस्थानी ठेवण्यात आले होते. सकाळी १० वाजता हलेकाय येथून त्यांचे पार्थिव नरीमन पॉईंट येथील एनसीपीए या ठिकाणी हलवण्यात आले. दुपारी ३.३० वाजेपर्यंत सर्वसामान्य नागरिकांना एनसीपीए या ठिकाणी टाटा यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता येईल.
एनसीपीएच्या प्रवेशद्वार क्रमांक ३ मधून अंत्यदर्शनासाठी प्रवेश दिला जाईल, तर प्रवेशद्वार क्रमांक २ मधून नागरिकांना दर्शन घेऊन बाहेर पडता येईल.दुपारी ३.३० वाजता टाटा यांचे पार्थिव अंत्यसंस्कार करण्यासाठी वरळीच्या दिशेने रवाना होईल. सायंकाळी ४ वाजता मरीन ड्राईव्ह मार्गे पेडर रोड करत ही अंत्ययात्रा वरळी येथील स्मशानभूमीत दाखल होईल. सायंकाळी ४.३० वाजता टाटा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात पारसी पद्धतीने अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती आहे.