पुणे : जळगावमधील बीएचआर (भाईचंद हिराचंद रायसोनी) पतसंस्थेतील गैरव्यवहारप्रकरणात एकाच दिवशी वेगवेगळे तीन गुन्हे दाखल केल्याप्रकरणी आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या तत्कालीन पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटक्के यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, गुन्ह्याबाबत पुणे पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळली असल्याचे पाहिला मिळाले असून, याबाबत बोलण्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नकार दिला. गृहविभागाच्या आदेशाने हा गुन्हा नोंदवला गेल्याचे सांगण्यात आले.
पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात सरकारतर्फे गुन्हे शाखेचे उपायुक्त निखील पिंगळे यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून भाग्यश्री नवटक्के यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. हा गुन्हा दाखल झाल्याने शहर पोलिसांसह राज्य पोलीस दलात खळबळ उडाली आहे. जळगावमधील भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरणातील संशयित सुनील झंवर याने गृहविभागाकडे तक्रार अर्ज दिला होता. त्यावरुन चौकशी सुरू होती.
त्यानंतर गृहविभागाच्या आदेशाने गुन्हा नोंदवला गेला असल्याचे समजते. एकाचवेळी तीन गुन्हे, तसेच दोन ठिकाणी तक्रारदार उपस्थित नसतानाही घाईत आणि कोणतातरी हेतू ठेवून गुन्हे नोंदवले असे नवटक्के यांच्यावर दाखल केलेल्या तक्रारीत म्हंटले आहे.
बीएचआरप्रकरणात ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील डेक्कन पोलीस ठाणे, ग्रामीण पोलीस दलातील शिक्रापूर व पिंपरी-चिंचवडमधील आळंदी पोलीस ठाण्यात नोव्हेंबर २०२० मध्ये तीन गुन्हे नोंदवले होते. पुण्यातील तपास आर्थिक गु्न्हे शाखेकडून सुरू होता. पतसंस्थेने स्वस्तात मालमत्ता विकत घेणे, तसेच कागदपत्रात फेरफार केल्याप्रकरणी जळगावमधून सुनील झंवरला अटक केली होती. तसेच, जळगावमधील मालमत्तेवर छापा टाकला होता.
आर्थिक गुन्हे शाखेच्या तत्कालिन पोलीस उपायु्कत भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली होती. पोलिसांच्या पथकाने जळगावत १० ठिकाणी छापे टाकले होते.
झंवर माजी मंत्री भाजप नेते गिरीश महाजन यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी त्यावेळी केला होता. यानंतर महाजन आणि खडसे यांनी एकमेकांवर आरोप केले होते. याप्रकरणात जळगावमधील भाजपचे विधान परिषदेचे आमदार चंदूलाल पटेल यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात ठेवीदार सेवानिवृत्त शिक्षिका रंजना खंडेराव घोरपडे (वय ६५) यांनी तक्रार दिली होती.