नागपूर : व्यवसाय करताना २० कोटींचा घोटाळा केल्याची तक्रार प्राप्त झाली असून, अटक न करण्यासाठी १५ लाख रुपयांच्या खंडणीच्या मागणीसाठी पोलिसांनी साथीदारांच्या मदतीने व्यावसायिकाचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.
या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी खंडणीसाठी अपहरण व अन्य कलमांन्वये गुन्हा दाखल करीत बजाजनगर पोलिस ठाण्याच्या दोन बीट मार्शलसह तिघांना अटक केली. या कारवाईमुळे पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे.या दोघांविरुद्ध लवकरच निलंबनाची कारवाई होईल.
गौरव पुरुषोत्तम पराळे (वय ३०, रा. रघुजीनगर), राजेश उत्तमराव हिवराळे (वय ३०, रा. सीताबर्डी पोलिस क्वॉर्टर) व आकाश राजू ग्वालबंशी (वय ३०, रा. संजय गांधीनगर, हुडकेश्वर), अशी अटकेतील खंडणी बहाद्दरांची नावे आहेत.
व्यावसायिकाची टीप देणारा विक्रांत मेश्राम (रा. उमरेड) हा फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. अजय मोतीराम वाघमारे (वय ३७, रा. खारघर, मुंबई) यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.