साईसंस्थानच्या सुरक्षा रक्षकांच्या नाकावर टिच्चून चोरांनी दिली बगीच्यात हिरवीगार सलामी..!
शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी येथे साईबाबा संस्थानच्या 200 रूम गार्डन मधून रात्रीच्या वेळी चक्क चंदनाचे झाड कापून गाभा चोरून नेल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. याआधीही साईबाबा संस्थानच्या विविध विभागांमध्ये चोरीचे प्रकार घडल्याच्या घटना घडल्या आहेत मग त्यात विद्युत विभागाच्या भांडार गृहातून विद्युत वस्तूंची चोरी असो वा देणगी काऊंटर वरील पावत्यांची अफरातफर करून पैशांची झालेली चोरी असो तसेच काही दिवसांपूर्वी साई नगर येथील इमारती मागील टेलिफोन च्या वायर चोरून नेण्याचा एक नव्हे दोनदा प्रकार घडल्याने साईबाबा संस्थानच्या वस्तू सुरक्षित कधी होणार हा प्रश्न आता नागरिकांमधून विचारला जात आहे
सदर घटना ही गेल्या रविवारची असून रात्रीच्या वेळी 200 रूमचे गार्डन बंद असते. मात्र त्या परिसराची सुरक्षा व्यवस्था पाहण्यासाठी सुरक्षा रक्षक तैनात असतात त्या सुरक्षा रक्षकांचा डोळा चुकवत चोरट्यांनी चंदनाचे झाड सुरक्षा रक्षकांच्या नाकावर टिच्चून अंधाराचा फायदा घेत कापून नेल्याने याबाबत मोठी चर्चा शिर्डीत होत आहे.याबाबत साईबाबा संस्थानच्या वतीने शिर्डी पोलिस स्टेशनला अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे . त्याचप्रमाणे साईनगर इमारतीच्या मागील बाजूस 37 हजारांची टेलिफोन आरमाड केबल चोरी गेली असून या प्रकरणी तीन महिलांवर गुन्हा रजिस्टर नंबर 1010/2023 भारतीय दंड संहिताचे 1860 नुसार 379,511 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर 10 हजार रुपये किमंतीचे चंदन झाड चोरी प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर 1048/2023 भारतीय दंड संहिता 1860 नुसार 379 कलमान्वये अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास शिर्डी पोलिस करीत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की,दिनांक 29/10/2023 1/11/2023 दरम्यान ते 200 रूम जवळील साई नगर इमारतीच्या पाठीमागील बाजूस चोरीची घटना घडली त्यावेळी साईबाबा संस्थानच्या द्वारावती भक्त निवासचे सर्व टेलिफोन बंद पडल्याने संबंधित विभागाचे अधिकारी यांनी तेथील टेलिफोन सर्व्हर तपासले असता कुठेतरी वायर कट झाल्याचे निदर्शनास आले मग संपूर्ण वायरिंग तपासली असता साई नगर रहिवासी इमारतीच्या मागील बाजूस चोरट्यांनी चक्क 37 हजारांची केबलच चोरून नेल्याची घटना समोर आलीआहे.
होते न होते तोच पुन्हा हाच प्रकार झाला मात्र तेथील काही रिक्षा चालकांच्या नजरेत हा प्रकार आला आणि त्यांनी वायर चोरून नेणाऱ्या महिलांना हटकले आणि चोरीचा प्रकार समोर आला या चोरीच्या घटनेत बाभळेश्वर येथील तीन महिला पकडल्या गेल्या व त्यानंतर हा प्रकार थांबला. मात्र काहीच दिवसांनी पुन्हा थेट गार्डन मध्ये चोरी झाली आणि भले मोठे चंदनाचे झाडच चोरट्यांनी कापून नेल्याची घटना घडली आणि कोणाच्याही नजरेत आले नाही. परंतु साईबाबा संस्थानच्या परिसरात अश्या चोऱ्या होणे आणि तेसुद्धा सुरक्षा रक्षक तैनात असताना यामुळे चोरट्यांची हिम्मत वाढत असून ही अत्यंत लाजिरवाणी बाब असून त्वरित याबाबत पाऊले उचलणे गरजेचे असल्याचे साई भक्त, ग्रामस्थ व येथील रहिवासी बोलत आहेत.