शेतकऱ्यांच्या समस्या जाणणारा पिपाडांसारखा दूसरा नेता नाही -शिवाजीराव अनाप
शिर्डी : एक हाडाचा शेतकरीच शेतकऱ्यांच्या समस्या समजू शकतो आणि ज्याला या समस्या कशा सोडवायच्या याची दूरदृष्टी आहे, धाडस आहे असा कणखर नेताच शिर्डी मतदार संघातील शेतकऱ्यांच्या समस्यांना खरा न्याय मिळवून देऊ शकतो, असे रोखठोक मत प्रगतशील शेतकरी तसेच मागील 2 दशकांपेक्षा अधिक काळ डॉ. राजेंद्र पिपाडा यांच्या खांद्याला खांदा लावून साथ देणारे शेतकरी नेते शिवाजीराव अनाप यांनी व्यक्त केले आहे.
शिर्डी विधान सभा मतदार संघात डॉ. पिपाडा यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे मुख्य लढत तीन रंगी होणार असल्याची चर्चा असतांना महाविकास आघाडी आणि महायुतीने दिलेल्या उमेदवारांपेक्षाही अपक्ष उमेदवार डॉ. राजेंद्र पिपाडा हे शेतकरी वर्गाला जवळचे वाटत असल्याने शेतकऱ्यांच्या मतांच्या जोरावर डॉ. पिपाडा हे विक्रमी मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास शिवाजीराव अनाप यांनी व्यक्त केला आहे.
डॉ. पिपाडा हे स्वत: शेतकरी असल्याने आणि शिर्डी-राहाता परिसरात त्यांनी प्रयत्न पूर्वक पेरू (जांब) शेतीला चालना दिलेली असल्याने व वेळोवेळी शेतमालाला भाव मिळावा म्हणून त्यांनी अनेक आंदोलने केलेली असल्याने त्यांच्यातील धाडस शेतकरी ओळखून आहेत. त्यांच्या तरुणपणात केवळ पाणीटंचाईमुळे जळून गेलेली डाळिंबाची बाग छातीवर दगड ठेवून तोडून टाकावी लागल्याचे शल्य ते कधीच विसरले नाहीत.
नेहमी शेतक-यांच्या पिकाला हमीभाव मिळवुन देणे असो, प्रशासनातील भ्रष्ट कारभारामुळे शेतकऱ्यांची होणारी आर्थिक पिळवणूक असो किंवा गणेश परिसरात उशीरा पाटपाणी मिळण्यामुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणावर झालेले नुकसान असो, याबाबत सातत्याने अनेक वर्षापासुन मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री, प्रशासकीय अधिकारी यांना भेटुन नेहमी पाठपुरावा करत राहणे राजुभाऊंनी कधीच सोडले नाही.
अलिकडेच त्यांनी शिर्डी येथील श्री साई बाबा मंदिरात हार-फूल अर्पण करण्यावर असलेली बंदी हटविण्यासाठी ज्या पद्धतीने कायदेशीररीत्या न्यायालयात तसेच राज्याच्या उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेशी असलेल्या राजकीय संबंधाचा वापर करुन प्रशासकीय पातळीवर हा विषय लावून धरला होता, तसे धाडस मतदार संघातील एकही राजकीय नेत्याने दाखवले नव्हते.
फूल शेती आणि परिसरात हार-फूल विकून उपजीविका करणारे शेतकरी हे कोणी लुटेरे नसून हार – फूल विक्रीवर बंदी घातल्याने त्यांचेवर व त्यांच्या कुटुंबावर उपासमार करण्याची वेळ आली. कोणाच्या इशाऱ्यावर ही बंदी घालण्यात आली होती, हे सगळ्यांना चांगलेच माहिती आहे. मात्र राजु भाऊ पिपाडा यांनी कोणत्याही राजकीय दहशतीला न जुमानता ज्या पद्धतीने हा लढा दिला,
काल त्यास यश येवून मा. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शिर्डी साई बाबा मंदिरात फूल हार अर्पण करण्यावर असलेली बंदी हटविण्याचा आदेश पारित केला आहे. हे अभूतपूर्व यश केवळ राजु भाऊ यांच्यामुळेच मिळू शकले याची जाणीव ठेवून काल शिर्डी परिसरात फूल शेती उत्पादक व विक्रेते यांनी ज्याप्रकारे फटाक्यांची आतिषबाजी करुन डॉ. पिपाडा यांचे आभार मानले, ते पाहता शिर्डी विधानसभेची आमदारकीची अर्धी लढाई आजच राजुभाऊ पिपाडा यांनी जिंकली असल्याचा विश्वास शिवाजीराव अनाप यांनी व्यक्त केला आहे.
नागपूर, वर्धा, अमरावती भागात मोठ्या प्रमाणावर संत्रा पीक उत्पादन होते. राज्याची गरज भागवून देशात व परदेशातही संतरा निर्यात मोठ्या प्रमाणावर होत होती. मात्र उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नव्हते, म्हणून तेथील शेतकऱ्यांनी प्रक्रिया उद्योग म्हणून संत्रा बर्फी, सोन पापडी सारखे धाडसी व क्रांतिकारक प्रयोग केले व त्याला अभूतपूर्व यश मिळून या भागातील शेतकरी बऱ्यापैकी सधन झाले.
मात्र आपल्या शिर्डी भागात अशी दूरदृष्टी नेत्यांनी न ठेवल्याने आपल्या भागातील शेतकरी पिकवित असलेले पेरू, फळ उत्पादन यावर प्रक्रिया आधारित उद्योग उभे राहू शकले नाही अशी खंत शिवाजीराव अनाप यांनी व्यक्त केली. मात्र डॉ. राजुभाऊ पिपाडा यांना आमदारकीची संधी मिळाल्यास ते १०० टक्के शेतकऱ्यांच्या समस्या सोडवतील असा विश्वास त्यांनी या निवडणुक प्रचाराचे निमित्ताने व्यक्त केला.