उमेदवारांची निवडणूक खर्चाची तिसरी तपासणी यशस्वी संपन्न
शिर्डी, – खर्च निरीक्षक ममता सिंग यांच्या उपस्थितीत शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सर्व उमेदवारांची निवडणूक खर्चाची तिसरी तपासणी राहाता येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय येथे आज यशस्वीपणे पार पडली. या तिन्ही तपासणींसाठी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधी उपस्थित राहून तपासणीच्या कामकाजांमध्ये प्रशासनाला सहकार्य केले. याबाबत खर्च निरीक्षक ममता सिंग यांनी समाधान व्यक्त केले.
या तपासणीस सर्व २० उमेदवारांपैकी काही उमेदवार स्वत: व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. याप्रसंगी निरीक्षक ममता सिंग यांनी स्वतः सर्व उमेदवारांच्या खर्चाच्या नोंदवह्यांची काटेकोरपणे तपासणी केली.
प्रथम व द्वितीय तपासणीनंतर उमेदवारांच्या खर्चाची दैनंदिन नोंदवही मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे. या तपासणीनंतरही उमेदवारांच्या खर्चाची दैंनदिन नोंदवही मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात येणार आहे.
सर्व उमेदवारांनी त्यांचा खर्च निवडणूकीच्या निकालाच्या दिनांकापर्यंत (४ जून) त्यांच्या दैनंदिन खर्च नोंदवहींमध्ये नोंदवावा, तसेच सदरच्या खर्चाचा हिशोब तंतोतंत जुळवून अनुषंगिक सर्व लेखे तयार करून २९ जून रोजी पुढील तपासणीसाठी व ताळमेळ घेण्यासाठी सादर करावेत, असे आवाहन खर्च निरीक्षक ममता सिंग यांनी केले आहे.
या तपासणीला समन्वयक अधिकारी (खर्च) सदाशिव पाटील, सहायक समन्वय अधिकारी (खर्च) बाबासाहेब घोरपडे व सचिन धस, सहायक खर्च निरीक्षक विवेक वर्मा, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता कैलास ठाकरे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.