उद्धव ठाकरेंना मानसोपचार तज्ज्ञाची गरज : देवेंद्र फडणवीस
भारताचे शेजारी असलेले व अनेक दशके उपद्रव माजवलेले शत्रूराष्ट्र गत दहा वर्षांत एकही बॉम्ब हल्ला करू शकले नाही त्याचे सर्व श्रेय देशाचे कर्तव्य कठोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जात असून आगामी काळात महायुतीसह त्यांचे सरकार निवडून देण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कोपरगाव येथे महायुतीच्या प्रचार सभेत बोलताना केला आहे.
शिर्डी लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार खा.सदाशिव लोखंडे यांच्या प्रचार सभा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी राज्याचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भागवत कराड,कृषिमंत्री दादा भुसे,आ.आशुतोष काळे,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन औताडे,संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष बिपीन कोल्हे,विधानसभेच्या सभापती आ.नीलम गोरे,माजी आ.बाळासाहेब मुरकुटे,माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी,संचालक,आदी प्रमुख मान्यवरासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”शिर्डीचा खासदार म्हणून येथील लोकप्रतिनिधीस देशात वेगळा सन्मान दिला जात असून त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवले जात असते.दरम्यान ही निवडणूक देशाचे भविष्य घडविण्याची निवडणूक आहे.या निवडणूक महायुती व महाघाडी आशा दोन गटात विभागली आहे.देशात विरोधकांची एकी असली तरी ते त्यांच्यात पंतप्रधान पद कोणास द्यायचे हे ठरलेले नाही.ते म्हणतात आम्हीं पाच पंतप्रधान करू.म्हणजे इंडी आघाडीकडून देशात संगीतखुर्चीचा खेळ सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.देशाचा असा खेळ करुन कसे चालेल ? असा सवाल उपस्थित मतदारांना करून इकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकासासाठी महायुतीचे मोठे शक्तिशाली इंजिन असल्याचा दावा केला आहे.त्यात सर्वाना सामावून घेण्याची व देशाचा विकास करण्याची मोठी मोदींची क्षमता असल्याचे सांगितले आहे.उद्धव ठाकरे,शरद पवार,लालू प्रसाद यादव,ममता बॅनर्जी आदी फक्त स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबाचा विकास करू शकत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.त्यांच्या कोणाचा कोणास मेळ नसल्याचा आरोप केला आहे.त्यांना केवळ त्यांच्या रेल्वे इंजिनास डबे नाही व इंजिनात बसण्यासाठी केवळ कुटुंबातील लोकांनां जागा असल्याचा आरोप केला आहे.सामान्य माणसाना बसण्यासाठी जागाच नाही.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की.”उद्धव ठाकरे पक्षांतर केल्यावर माजी खा.वाकचौरे यांना ‘गद्दार’ व तुपचोर’ म्हणाले होते.मग आज ते पावन कसे झाले यातील तुपाचा वाटा उद्धव ठाकरे यांना किती मिळाला असा सवाल केला आहे.बाळासाहेब ठाकरे काँग्रेस बद्दल बोलताना म्हणाले होते की,” आपला पक्ष विसर्जित करील पण काँग्रेसशी युती करणार नाही.आज उद्धव यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तत्व मातीमोल केले आहे.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिलांना गॅस दिला,आरोग्य हमी दिली आता त्यांना लखपती करणार आहे.सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम मोदींनी केले आहे.देशातील तरुणांना विनातारण मुद्रा लोन दिले.त्याची मर्यादा आता वीस लाखांपर्यंत वाढवली आहे.महिलांना ३६ टक्के आरक्षण दिले आहे.त्यांना राजकीय आरक्षण देऊन न्याय दिला जाणार आहे.विश्वकर्मा योजना राबविल्या आहेत.
दरम्यान राज्यातील सिंचनाबाबत बोलताना ते म्हणाले की,”या सरकारने सिंचनाचे काम मोठे केले आहे.निळवंडेचे काम २०१७ ला हाती घेतले असल्याचा दावा करून अद्याप कालवे आणि चाऱ्या त्यांचे अस्तरीकरण अपूर्ण असताना तो पूर्ण केल्याचा दावा केला आहे.राज्यात शाश्वत सिंचनासाठी राज्यातील अनेक प्रकल्प मार्गी लावले असल्याचे सांगून पश्चिमेचे पाणी पूर्वेकडे वळविण्यासाठी मोठा आराखडा तयार करणार असल्याचे म्हटले आहे.
राज्यातील ऊस उत्पादकांना ३४० ने एफ.आर.पी.वाढवला असल्याचा दावा केला आहे.इथेनॉल धोरण राबवले असल्याचा दावा केला मात्र त्याचा फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाही याबाबत सविस्तर मौन पाळले आहे.मात्र त्याचा सहकारी साखर कारखान्यांना त्याचा फायदा झाला असल्याचे सांगितले आहे.दरम्यान राज्यातील सहकारी साखर कारखान्याचा आयकर रद्द केला आहे.शेतकऱ्यांना ऊसास चांगला भाव दिला तर सरकारला आयकर द्यावा लागत होता अशा तक्रारी होत्या.नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी सहकारी कारखान्यांचा सुमारे १० हजार कोटींची आयकर रद्द केला असल्याचे सांगितले आहे.
राज्यासह देशभरात मोदी यांनी मोठ्या प्रमाणावर रस्ते,पूल,औद्योगिकीरण यावर मोठे काम केले आहे.मात्र उद्धव ठाकरे यांनी याच समृध्दी महामार्गाच्या भूसंपादनास विरोध केला असल्याची आठवण करून दिली आहे.त्यावेळी तालुक्यातील शिक्षण संस्थांचे कौतुक करून त्यांनी तरुणांना रोजगार दिला असल्याचे सांगितले आहे.शेवटी त्यांनी उत्तर नगर जिल्ह्यातील प्रचलित घराणी असलेल्या काळे-कोल्हे यांनी मतभेद दूर करून देशहित पाहिले असल्याचा मोठा दावा त्यांचे नाव न घेता केला आहे.व शेवटी उपस्थित मतदारांना खा.लोखंडे यांना निवडून आणण्याचे आवाहन शेवटी केले आहे.
सदर प्रसंगी उमेदवार खा.सदाशिव लोखंडे,माजी आ.स्नेहलता कोल्हे,माजी नगराध्यक्ष डॉ.राजेंद्र पिपाडा,आदींनी उपस्थितांसमोर मनोगत व्यक्त केले आहे.
सदर प्रसंगी प्रास्तविक शिंदे सेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन औताडे यांनी केले तर सूत्रसंचालन भाजप कोल्हे गटाचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे यांनी केले आहे तर आभार गणूभाऊ जाधव यांनी मानले आहे.
व्यासपीठावर बरोबर दोन वाजता देवेंद्र फडणवीस यांनी भाषणास सुरुवात केली व २.३५ मिनिटांनी आपले भाषण संपवले आहे.दरम्यान या प्रचार सभेसाठी विद्यमान आ.आशुतोष काळे व माजी आ.स्नेहलता कोल्हे या दोन्ही गटासह भाजप,राष्ट्रवादी बरोबर असताना गर्दी मात्र अपेक्षित जमली नसल्याचे दिसून आले आहे.
चौकट-उद्धव ठाकरेंना मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. तसंच पराभव स्पष्ट दिसू लागल्याने उद्धव ठाकरे अशा प्रकारे बोलत आहेत असाही टोला फडणवीसांनी लगावला.उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांना आता डॉक्टरची गरज आहे. ते रोज काहीतरी बदलत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करावे.”, असा सणसणीत टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावला आहे. पुढे बोलताना त्यांना शिव्या देण्याशिवाय दुसरं सध्या काहीही सुचत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. जनतेनं त्यांना रिजेक्ट केलेलं आहे, त्यामुळे ते शिवीगाळ करण्यावर उतरले आहेत, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
“अजित पवारांनी शरद पवारांबरोबर पक्ष उभा केला. पण त्यांना बाहेर पडावं लागलं कारण त्यांना लक्षात आलं की आपल्याला पक्ष मिळणार नाही. आपल्याला पक्षात स्थान मिळणार नाही. सुप्रिया सुळेंनाच ते पक्षाची जबाबदारी मिळणार हे समजल्यामुळे ते बाहेर पडले.” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.