शिर्डी : शिर्डी विधानसभा मतदारसंघात दिवसेंदिवस प्रचाराला रंगत येत असून 40 वर्ष या मतदारसंघात असलेली घराणेशाही मोडीत काढून जनता जनार्दन परिवर्तन घडविल्याशिवाय राहणार नाही, असा ठाम विश्वास भाजपा बंडखोर तथा ऑटो रिक्षा निवडणूक चिन्हावर उभे राहिलेले अपक्ष उमेदवार डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी व्यक्त केला.
मी ऑटोरिक्षा चिन्हावर अपक्ष उमेदवारी लढवित असलो तरी या मतदारसंघातील जनतेने माझा सर्व जाती-धर्मातील लोकांसाठीचा संघर्ष जवळून पाहिलेला आहे. विखेंचा आणि त्यांच्या प्रचंड यंत्रणेचा मी एकदा नव्हे तर दोन वेळेस पराभव करुन माझी पत्नी सौ. ममता पिपाडा यांना 2 वेळेस राहाता नगर परिषदेत लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आणले आहे. त्यामुळे विखेंच्या दहशतीला न जुमानता त्यांच्या 40 वर्षांच्या घराणेशाहीला मीच मोडून काढू शकतो,
हा विश्वास मतदारांमध्ये निर्माण झाला असल्याचे प्रतिपादन डॉ. पिपाडा यांनी केले. माझी पत्नी सलग 20 वर्षे नगरसेविका व 2 टर्म लोकनियुक्त नगराध्यक्ष असतांना आम्ही परिसरातील अतिक्रमणं काढतांना त्याठिकाणी छोटे मोठे टपरिधारक फुटपाथ विक्रेते यांच्या उपजीवेकेचा सहानुभूतीने माणुसकी दाखवत विचार केला. शहराच्या सौंदर्यीकरणाला महत्व देतांना गुणवत्तेत कोणतीही तडजोड केली नाही
, म्हणूनच राहाता येथील स्मशानभूमी सुद्धा आम्ही इतकी दर्जेदार बांधून दाखवली की, तेथील स्मशाणजोगी यांनी त्यांच्या कन्येचा विवाह सुद्धा याठिकाणी संपन्न केला. त्यामुळे पिपाडा आणि गुणवत्ता हे समिकरण लोकांमध्ये पक्के झाले आहे. म्हणूनच भ्रष्टाचार करणाऱ्या विरोधकांना आम्ही सहन होत नाही व मला राजकीय पक्षाची उमेदवारीच मिळू नये, असे डावपेच वापरले गेले. मी आमदार म्हणून विधानसभेत निवडून गेलो तर या भागातील दूध उत्पादकांना या खात्याचे मंत्री असलेले विखे जो हमी भाव मिळवून देऊ शकले नाही,
तो हमीभाव पिपाडा नक्की मिळवून देतील, ही खात्री दूध उत्पादकांना आहे. शिवाय अनुदानाची तुटपुंजी भीक देण्याऐवजी मी शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळवून देण्यासाठी, या भागात मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या पेरू पिकावर नागपूरच्या संत्रा पिकावर जसे प्रक्रिया उद्योग आहेत, त्या धर्तीवर पेरू प्रक्रिया उद्योगास चालना देईल. शिर्डी-मनमाड-नगर रोड मागील 20 वर्षांपासून अपघाताचा सापळा बनला असून आजवर शेकडो बळी या रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे गेलेले आहेत,
आणि याला मागील 40 वर्षांपासून सत्ता उपभोगणारे विखे जबाबदार आहेत. मात्र मी आमदार होताच या शिर्डी-मनमाड-नगर रस्त्याचे मजबूतीकरण करणे, तसेच श्री साई बाबांच्या मंदिरात फुलं-हार-प्रसाद अर्पण करण्यावर असलेली बंदी हटवून फूल शेती उत्पादकांना उत्पन्नाचा मार्ग मोकळा करुन देणे,
राज्यभरातून येणाऱ्या गोरगरिब रुग्णांचे आशास्थान असलेले श्री साई बाबा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सर्व सुविधा व तज्ञ डॉक्टरांसह सुसज्ज करण्याला प्राथमिकता देणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जगभरातील साई भक्तांच्या शिर्डी शहराला आंतरराष्ट्रीय दर्जाचे तीर्थक्षेत्र आणि पर्यटनस्थळ म्हणून नावलौकिक मिळवून दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असे ठाम प्रतिपादन डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी केले.
शिर्डी मतदार संघाच्या विकासाआड येणाऱ्या घरणेशाहीला मोडून काढल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही आणि म्हणूनच मी अपक्ष उमेदवार असलो तरी विखेंना मीच हरवू शकतो ही खात्री लोकांमध्ये असल्याने मी प्रचंड बहुमताने निवडून येईल असा विश्वास डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी व्यक्त केला आहे.