शिर्डी, दि.१७ – विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजित ‘लोकशाही उत्सव’ स्पर्धेत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी गावपातळीवर रांगोळी, सुकेशिनी, मेहंदी आणि घोषवाक्यांच्या माध्यमातून जनजागृती केली.
“रंगावली लोकशाहीची” या विषयावर विशेष रांगोळ्या काढून लोकशाहीचा संदेश पोहोचविण्यात आला. अंगणवाडी केंद्र, शाळा, रस्ते आणि गावाच्या परिसरात लोकशाहीची प्रतीके व संदेश रेखाटून मतदारांमध्ये जागृती करण्यात आली. या उपक्रमात गावातील महिलांचा सहभाग लक्षणीय ठरला. बाल विकास अधिकारी मीना चव्हाण व शैला गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
निवडणूक निर्णय अधिकारी अनुपसिंह यादव यांनी या उपक्रमांचे कौतुक केले असून अशा प्रयत्नांमुळे ग्रामीण भागातील मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त त्यांनी केला आहे.