पोर्शे प्रकरणात बडे मासे अडकणार? डॉक्टरांना नोटीस; वैद्यकीय परिषदेकडून कारवाईचे संकेत पोर्शे प्रकरणात बडे मासे अडकणार?
शनिवारी मध्यरात्री कल्याणीनगरमध्ये पोर्शे कारला अपघात झाला. त्यावेळी कार अल्पवयीन आरोपी चालवत होता. तर चालक गंगाराम पुजारी त्याच्या शेजारी बसला होता.
पुजारीनं गुन्हा स्वत:च्या अंगावर घ्यावा आणि लेकाची सुटका व्हावी यासाठी अगरवाल कुटुंबानं त्याच्यावर दबाव टाकला. त्याला जबरदस्तीनं कारमध्ये बसवून अज्ञात स्थळी नेलं. आता हीच कार पोलिसांनी जप्त केली आहे.रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार करणाऱ्या डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोरला पोलिसांनी काल अटक केली.
यातील अजय तावरे ससूनच्या फॉरेन्सिक लॅबचे प्रमुख आहेत. अटक करण्यात आल्यानंतर त्यांनी मी गप्प बसणार नाही. सगळ्यांना उघडं पाडणार, अशी धमकी दिली. त्यामुळे तावरे कोणाकोणाला गोत्यात आणणार की तावरेमुळे आपण अडकू नये या भीतीनं तावरेच्या सुटकेसाठी कोण कोण प्रयत्न करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार प्रकरणी आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय पोलिसांनी न्यायालयात व्यक्त केला आहे.
आरोपींच्या घरांची झडती घ्यायची असल्याचं पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं. पोलीस कोठडीत असलेला डॉ. तावरे याआधीही अनेकदा वादात सापडला आहे. २०२२ मध्ये देशभरात किडनी तस्करीची अनेक प्रकरणं उघडकीस आली. राज्यातही असे प्रकार घडले होते. तेव्हा ससूनचे अधीक्षक डॉ. अजय तावरेची उचलबांगडी करण्यात आली होती.