शिर्डी ( प्रतिनिधी)
शिर्डी नजीक असलेल्या निमगाव -कोऱ्हाळे येथील प्रसिद्ध व पुरातन अशा श्री खंडोबा मंदिरात चंपाषष्ठी महोत्सवा निमित्त आयोजित श्री साईसतचरित्र पारायण व किर्तन महोत्सवाची आणि येथील यात्रेची मोठ्या उत्साहात नुकतीच सांगता झाली.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही राहता तालुक्यातील निमगाव कोराळे येथे प्रसिद्ध पुरातन अशा श्री खंडोबा मंदिरामध्ये चंपाषष्ठी उत्सव मोठ्या उत्साहात व विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होत असतो .
यावर्षीही चंपाषष्ठी निमित्त येथे श्री साईसत चरित्र पारायण व कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला होता. दररोज सकाळी काकड आरती व सात दिवस सकाळी सात ते अकरा या कालावधीत श्री साई चरित्र पारायण अध्याय वाचन होत होते. सायंकाळी सात ते नऊ या दरम्यान कीर्तन व त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होत होता. राहता तालुक्यातील निमगाव कोराळे येथील
या खंडोबा मंदिरात अधून मधून साईबाबा सुद्धा येत होते. असा उल्लेख आढळतो.
असे हे प्रसिद्ध मंदिर असून या मंदिराचा जीर्णोद्धार नुकताच करण्यात आला आहे व भव्य दिव्य असे आकर्षक नवीन मंदिर बनवण्यात आले आहे. या मंदिर व परिसरात चंपाषष्ठी महोत्सवानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. चंपाषष्ठीला शनिवारी सात डिसेंबर 2024 रोजी सकाळी अकरा ते दीड या कालावधीत काल्याचे किर्तन होऊन वांग्याची भाजी व भाकरीचा, महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. तत्पूर्वी श्री साई चरित्र पारायणाची मोठ्या उत्साहात सांगता झाली. ग्रंथ मिरवणूक ही गावातून काढण्यात आली होती. चंपाषष्ठी या दिवशी येथे मोठी यात्रा भरली होती .
मंदिरासमोर अनेक हार प्रसाद मिठाई खेळणी आदींची दुकाने थाटली होती. तसेच चंपाषष्ठी च्या दिवशी अनेकांनी भाकरी व वांग्याच्या भाजीचा महाप्रसाद घेतला. अनेक भाविक मंदिरामध्ये श्री खंडोबाची तळी भरताना दिसत होते, येळकोट येळकोट जय मल्हार म्हणत भंडारा उधळण्यात येत होता. चंपाषष्ठी च्या दिवशी हजारो भाविकांनी येथे येऊन मनोभावे श्री खंडोबा महाराजांचे दर्शन घेतले. येथे चंपाषष्ठी निमित्त आयोजित श्री साईसतचरित्र पारायण, कीर्तन महोत्सव तसेच यात्रा व महाप्रसाद आदी
सर्व कार्यक्रम व्यवस्थित संपन्न व्हावे यासाठी श्री खंडोबा महाराज देवस्थान ,विश्वस्त तसेच निमगाव ग्रामस्थ ,खंडोबा भक्त ,भाविक यासाठी परिश्रम घेतले.